नवी दिल्ली : भाजपच आपल्याला रोडमॅप दाखवते, आपण काय केले नाही पाहिजे हेही त्यांच्याकडूनच शिकायला मिळते. त्यामुळे एका अर्थाने भाजप माझा गुरूच आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून आम्हाला बरेच असेही त्यांनी म्हटले आहे. आज येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, माझी इच्छा आहे की भाजपने आमच्यावर आक्रमकपणे हल्ला करावा, यामुळे काँग्रेस पक्षाला त्यांची विचारधारा समजण्यास मदत होईल असे ते म्हणाले की, जेव्हा मी ही यात्रा सुरू केली, तेव्हा मी ती कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक सामान्य यात्रा म्हणून सुरू केली होती. नंतर या यात्रेला एक आवाज आणि भावना आहेत असे लक्षात येत गेले. भारत जोडो यात्रेचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, आम्ही कोणालाही आमच्यात सामील होण्यापासून रोखणार नाही. अखिलेशजी, मायावतीजी आणि इतरांना ‘मोहब्बत का हिंदुस्थान’ हवा आहे, असे नमूद करीत त्यांनी या यात्रेत सहभागी होण्याचे अन्य पक्षीयांनाही निमंत्रण दिले आहे.
ही यात्रा दिल्लीत नऊ दिवसांसाठी थांबली असून ती पुन्हा ३ जानेवारीला पुढे मार्गस्थ होणार आहे. यात्रेचा समारोप काश्मिरात होत आहे. हा समारोप २६ जानेवारीला व्हावा असा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे असेही सांगण्यात येत आहे.
राहुल यांनी जावे- सरमा नागपूरला
राहुल गांधी जर आरएसएस आणि भाजपला आपला गुरू मानत असतील तर त्यांनी नागपूरलाही गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी दिली आहे. त्यांनी भारतमातेच्या झेंड्याला गुरू मानावे आणि नागपूरला जाऊन गुरूदक्षिणा द्यावी, असा सल्लाही सरमा यांनी दिला आहे.




