पुणे – म्हाडाने गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी केली आहे. यापूर्वी म्हाडाच्या घरांसाठी विविध प्रकारच्या सुमारे २१ कागदपत्रांची आवश्यकता होती. मात्र, आता फक्त सात कागदपत्रांचीच पूर्तता करावी लागणार आहे. तसेच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज ही कागदपत्रे ऑनलाइन पध्दतीने सादर करावी लागणार आहेत. यामुळे आता घरांची सोडत ते प्रत्यक्ष घरांचा ताबा या प्रक्रियेतील वेळ वाचणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज होते. केल्यानंतर लॉटरीमध्ये विजेता ठरल्यास ठराविक दिवसांमध्ये कागदपत्रे म्हाडाकडे सादर करावी लागत होती. या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर कागदपत्रे पूर्ण असतील तरच अलॉटमेन्ट लेटर संबंधित विजेत्याला देण्यात येत होते. मात्र काही अर्जदारांना घरे मंजूर झाल्यानंतर कागदपत्रे पूर्ण नसल्याने ते घर नाकारण्यात येत होते. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील पुढील व्यक्तीला ते घर द्यावे लागत होते.
तसेच प्रतिक्षा यादीतील व्यक्तीला सुध्दा कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. या सर्व प्रक्रियेत वेळ जात होता म्हणून म्हाडाने कागदपत्रांची संख्या कमी केली असून छाननीची प्रक्रिया सुध्दा ऑनलाइन केली आहे.
आवश्यक कागदपत्रे…
■ ओळखीचा पुरावा आधारकार्ड (आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक), पॅनकार्ड
■ सध्याचा वास्तव्याचा पुरावा अर्जदाराच्या आधारकार्ड वरील पत्ता हा सध्याच्या पत्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा पत्ता नमूद करणे आवश्यक
■ महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तहसीलदार यांनी दिलेले – अधिवास प्रमाणपत्र
■ स्वतःचा उत्पनाचा पुरावा आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा
■ पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा नोकरी असल्यास पती / पत्नीचा आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा आणि स्वयंघोषणापत्र.
एखाद्याला ‘म्हाडा’च्या घराची लॉटरी लागूनही केवळ कागदपत्रांची पूर्तता न केल्याने संबंधित व्यक्ती अपात्र ठरते. परिणामी अनेक घरे रिकामी राहतात. त्यामुळे म्हाडाने कागदपत्रांची संख्या कमी केली आहे. आता ऑनलाइन सुविधेमुळे अर्ज व कागदपत्रांची पडताळणी वेगाने होणार आहे. ही कागदपत्रे डीजी लॉकर मध्ये ठेवली जाणार आहे. घरे मिळाल्याची माहिती अर्जदाराला एसएमएस व ईमेलद्वारे दिली जाणार आहे.
-नितीन माने पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी




