मुंबई ; ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली. कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने छापेमारी केली. यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं सांगितलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. यापूर्वी किरीट सोमय्यांनी यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेत मस्तीची भाषा केली होती. शिंदे गट आणि भाजपाला हे चौघेजण सरेंडर झाल्यावर चौकशा बंद करण्यात आल्या. पण, त्यांच्या धमकीला भिक न घालणाऱ्या नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊतांना त्रास दिला. आज परत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सोमय्यांनी पंगा घेतला आहे. अनिल परब यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर ही मस्तीची भाषा आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग, आयकर विभाग तुमच्या दावणीला बांधलेल्या संस्था आहेत असा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे.



