पुणे : पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यन्वित केले असल्याची माहिती पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. या पथकाकडून दहशत माजविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
वानवडीतील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन (एसआरपीएफ) येथे होत असलेल्या ३३ व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचेचे उद्घाटन पोलीस महासंचालक सेठ यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता पोलीस महासंचालक सेठ यांनी संगितले की, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. २०२२ या वर्षात राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. गडचिरोली तसेच गोंदिया नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा चांगला वचक आहे. तेथील नक्षलवादी कारवाया रोखण्यात पोलीस दलाला यश मिळाले. पुण्यातील कोयता गँगबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याची दाखल घेऊन विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत.
करोनाच्या साथीमुळे तीन वर्षांच्या खंडानंतर पोलिसांच्या स्पर्धा होऊ शकली नाही. यामध्ये राज्यातील पोलीस गटातून खेळाडू सहभागी होतात. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंना नॅशनल स्पर्धेसाठी निवड केली जाते. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पोलीस स्पर्धेत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक मिळाला होता, असे सेठ यांनी सांगितले.




