आंध्र प्रदेश : हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये जावयाला विशेष स्थान आणि मान आहे. प्रत्येकजण आपआपल्या परीने जावयाची बडदास्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये जावयाला काही कमी पडू नये म्हणून खूप काळजी घेतली जाते. आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरमध्ये एका जावयाच्या स्वागतासाठी तब्बल १७३ खाद्यपदार्थ तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सासूबाईंनी चार दिवस राबून हे खाद्यपदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे ‘जावयाचा रुबाबच भारी!’ असेच म्हणावे लागेल.

भीमावर शहरातील व्यापारी टाटावर्ती बर्दी यांनी हैदराबाद येथील रहिवासी असलेला आपला जावई चावला पृथ्वीगुप्त आणि मुली श्री हरिका यांना मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त आमंत्रिक केले होते आणि त्यासाठी तब्बल विविध प्रकारचे १७३ खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते,
याबाबत टाटावर्ती बर्दी म्हणाले, “कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून माझी मुलगी आणि जावई घरी येऊ शकले नाहीत. या कालावधीत आम्ही त्यांच्याबरोबर मकरसंक्रातीचा सण साजरा करू शकलो नाही. परंतु या वर्षी त्यांना आम्ही मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त आमंत्रित केले आणि सण साजरा केला.
हे पदार्थ तयार करण्यासाठी पत्नी संध्या यांनी चार दिवस खूप परिश्रम घेतले. ज्यावेळी आमची मुलगी आणि जावई जेवणासाठी आले, त्यावेळी त्यांना पानामध्ये सर्व खाद्यपदार्थ वाढण्यात आले.” संध्या बर्दी सांगतात, “जावई आणि मुलगी येणार म्हणून खास पदार्थ तयार करण्यात आले. त्यामध्ये भजी, पुरी, हलवा, पापड, लोणचे, शीतपेय आणि विविध प्रकारची मिठाई यांचा समावेश आहे. माहेरी झालेले हे स्वागत पाहून मुलगीही खूप आनंदित आहे. आम्ही सर्वांनी एकत्रित बसून जेवणाचा आनंद घेतला.




