![]()
पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे तर या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. अशामध्ये भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसब्यातच भाजपला उमेदवार ठरवण्यासाठी मोठी डोकेदुखी होत आहे.
भाजपतर्फे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रसाने, माजी महापालिका गटनेते गणेश बिडकर, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांचे नावे चर्चेत आहेत. मात्र, यांपैकी नक्की कोणाला उमेदवारी द्यावी यावरून भाजपमध्ये अंतर्गत खलबत सुरु असून. यासाठी सर्व्हेची मदत घेण्यात येत आहे.
भाजपने शहराबाहेरील तीन संस्थांकडून उमेदवार कोण असावा, यासाठी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्व्हेचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवला जाईल. त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण गेली ३० वर्ष भाजपची एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपला उमेदवार निश्चित करण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. अशात ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ ही घोषणा मात्र या पोटनिवडणुकीतून गायब दिसत आहे.



