पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची नावे निवड समितीपुढे ठेवली जाणार आहेत. त्यासाठी उद्या (ता. २) मुंबईत बैठक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या जागेवर दावा केल्याने त्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या बैठकांमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरवात झाली आहे. मात्र, अद्याप एकाही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेला नसला तरी घडामोडींना वेग आलेला आहे. काँग्रेसचे नेते भारत जोडो यात्रेमध्ये गेल्याने पुण्यात व प्रादेशिक पातळीवर कोणीही चर्चा करण्यासाठी उपलब्ध नव्हते. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी म्हणून एकही बैठक न झाल्याने निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नाही. तर दुसरीकडे भाजपने पाच इच्छुकांची नावे प्रदेश भाजपकडे पाठवले आहेत, सर्वेचा अहवालही नेत्यांकडे सादर झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात जाहीर होणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेले काँग्रेसचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांनी सोमवारी १६ इच्छुकांची व्हिडिओ कॉलद्वारे मुलाखती घेतल्या. ते गुरुवारी मुंबईत पोचणार असून, इच्छुकांचा अहवाल प्रदेशाच्या निवड समितीकडे सादर करणार आहेत.
त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेते चर्चा करून केंद्रीय समितीच्या मान्यतेने उमेदवार जाहीर करणार आहेत. ही बैठक देखील उद्या होणार आहे, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, ही जागा काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली नव्हती. पण मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काही पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत आपणच निवडणूक लढवली पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार ९ जणांची यादी तयार केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. यावेळी इच्छुकांसह आमदार, माजी आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित असतील, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.


