पुणे, दि. 2 – शहरातील प्रवाशांची मागणी आणि सेवा यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सर्व 367 मार्गांचे पुन्हा एकदा नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या ताफ्यातील सर्व बसचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या यांचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, लवकरच काही मार्गांचे विस्तारीकरण आणि काही मार्गावर बसची वारंवारत वाढणार आहे.
पीएमपीतर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीएच्या हद्दीत 367 मार्गांवर सेवा दिली जाते. पीएमपीने आयटीएमएसची सेवा सुरू करण्यासाठी चार ते साडेचार वर्षांपुर्वी सर्व मार्गांची माहिती गोळा करून मार्गांचे नियोजन केले होते. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन मार्गांवर बस सेवा सुरू केली होती. पण, पीएमपीचे दिवसेंदिवस तोटा वाढत असल्याने अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी सर्व मार्गांचे पुन्हा नियोजन करण्याचे आदेश दिले होते.
त्यानूसार पीएमपीच्या वाहतूक विभागाने सर्व मार्गांच्या उत्पन्नाची आणि प्रवासी संख्येची माहिती घेवून आतापर्यंत 30 टक्के मार्गांचे नियोजन केले आहे. यात प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन 26 मार्ग सुरू केले आहेत. तर प्रवाशांची संख्या कमी असल्याने 23 मार्ग बंद केले आहेत. तसेच उत्पन्न कमी असल्याने काही मार्गावरील सकाळी 5.45 पूर्वीच्या आणि रात्री 9.30 नंतरच्या बसची 10 मिनटांऐवजी 30 मिनटे वारंवारीता करून ज्या मार्गांवर मागणी आहे त्या मार्गांवर या बसेस सोडण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांची मागणी जास्त असल्याने वारंवारीता वाढविण्यासाठी जनरल आणि ब्रोकन बसेसची संख्या 232 वरून 334 करण्यात आली आहे.
त्यामुळे गर्दीच्या वेळेस प्रवाशांना बससाठी जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही. तसेच बीआरटी मार्गावरील 746 वरून 762 पर्यंत बस संख्या वाढविली आहे. पीएमपीच्या लांब पल्याच्या मार्गांवर शेवटच्या खेपेस व सकाळी पहिल्या खेपेस प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने पीएमपीने 43 शेड्यूल मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमपीचे ठेकेदारांना जास्तीच्या किलोमीटरसाठी द्यावे लागणारे पैशांची बचत होणार आहे. पीएमपीचे नियोजन प्रत्यक्ष कागदावर जरी केले जात असले तरी प्रत्यक्षात याची अमंलबजावणी होने गरजेचे आहे.



