नांदेड : रविवारी भोकरमधल्या सभेतला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या मेळाव्यामध्ये अशोक चव्हाण यांनी गळ्यात भगवा शेला घातला होता. अशोक चव्हाणांच्या गळ्यात भगवा शेला दिसल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाल्या. यानंतर अशोक चव्हाण यांनी स्वत:च भगवा शेला का घातला, याचं कारण सांगितलं.
ही महाविकासआघाडीची सभा आहे. गळ्यातला भगवा शेला शिवसेनेचा आहे, तर हातातील घड्याळ राष्ट्रवादीचं आहे आणि बाकी काँग्रेस आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. मागच्या काही काळापासून अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू होत्या.
शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळीही काँग्रेसचे काही आमदार गैरहजर राहिले, त्यामध्ये अशोक चव्हाण होते, त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले, पण अशोक चव्हाण यांनी आपण काँग्रेसमध्येच असून पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगत, या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तसंच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही अशोक चव्हाण सहभागी झाले होते.



