- बोर्लीपंचतन येथे महिला दिन उत्साहात संपन्न.
बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान “उमेद” अंतर्गत स्थापन झालेल्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनच्या सह्याद्री महिला ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात प्रतिनिधीत्व करताना सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गावातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये गावच्या पहिल्या महिला सरपंच पदाचा मान मिळवलेल्या जोत्स्ना हेदूकर,थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच नम्रता गाणेकर,विद्यमान सरपंच ज्योती परकर,पंचायत समितीच्या माजी सभापती मिना गाणेकर व स्वाती पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर, विधवा प्रथा बंदीचा धाडसी निर्णय घेणाऱ्या स्वाती खोत,महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द प्रयत्नशील असणाऱ्या पद्मिनी खोपकर, दारुबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्षा वैशाली पयेर,विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाभावी कार्य करणाऱ्या आरती पाचारकर त्याचबरोबर गावातील दानशूर व्यक्तिमत्व व आपल्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातलं मुल ज्या शाळेत शिकलं त्या शाळेला आपली जमीन विना मोबदला देऊन जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणारे संस्थेचे विश्वस्त श्री.रविंद्र (दादा)कुलकर्णी यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी वसुधा कुलकर्णी अशा महिलांच्या कार्याचा गौरव म्हणून सह्याद्री महिला ग्रामसंघाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
आजची महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.अगदी गावच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत ती आघाडीवर आहे. एस.टी.बसच्या वाहक पदाचा यशस्वीपणे कार्यभार सांभाळणाऱ्या महिला आता काही दिवसांत आपल्याला एस.टी.बस चालवताना दिसतील.जेव्हा जेव्हा महिलांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे.अशा भावना सह्याद्री महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मानसी जाधव यांनी व्यक्त केल्या.महिला दिनाच्या औचित्याने महिलांच्या संघटन शक्तीतून कमी कालावधीत या कार्यक्रमाचं आयोजन करुन गावातल्या महिलांचा सन्मान केल्याबद्दल सरपंच ज्योती परकर यांनी सह्याद्री महिला ग्रामसंघाचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आपल्या व्यस्त कार्यालयीन कामकाजामुळे उपस्थित राहू न शकलेले श्रीवर्धन तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी व पंचायत समिती राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती विभाग अभियान व्यवस्थापक तथा प्रभाग समन्वयक किशोर गोराटे यांनी महिला दिनाच्या औचित्याने गावातील विविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्दल ग्रामसंघाच्या अध्यक्षा मानसी जाधव व त्यांना सहकार्य करणाऱ्या पदाधिकारी व सर्व महिला सदस्यांचं कौतूक केलं.
कार्यक्रमाचं सुत्र संचालन करणाऱ्या प्रथमेश महिला बचत गटाच्या सदस्या अभिरुची मुकादम, ग्रामसंघाच्या पदाधिकारी मुमताज हद्दादी,आशा हळदे, लिपिका अमृता शिरवटकर, सदस्या प्राजक्ता तोंडलेकर, आदीती मयेकर त्याचबरोबर उपस्थित सर्व महिला सदस्यांच्या लाभलेल्या सहकार्याबद्दल मानसी जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी उपसरपंच भूमी कांबळे,ग्राम पं.सदस्य सायली गाणेकर आणि ग्रामसंघाच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



