मुम्बई : राज्यातला शेतकरी अवकाळी पावसाने संकटात आला असताना कांदा आणि कापसाला हमीभाव मिळावा, यासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून जवळपास रोज पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. शुक्रवारी सकाळीदेखील आघाडीचे आमदार गळ्यात कांद्याच्या, कापसाच्या माळा घालून आणि हातात मोठे भोपळे घेऊन विरोधकांनी घोषणाबाजी केलीच. गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर सभागृहाबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी झुंबड उडाली होती. मात्र, अनेकांना त्या देता आल्या नव्हत्या. शुक्रवारी असे अनेक आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमून घोषणाबाजी करीत होते. हातात मोठे भोपळे घेऊन जनतेच्या हाती सरकारने भोपळा दिला असल्याच्या घोषणा हे आमदार करीत होते. या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले तर, ते म्हणाले, त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला हे नक्की!
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बना पटोले आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील मतभेद विधानभवनातून… अजूनही धुमसत आहेत. यापुढे काँग्रेसमधील वाद मिटवून कामाला लागा, असा संदेश हायकमांडने दोन्ही नेत्यांना दिला असला, तरी अजूनही आग धुमसते आहे, असे म्हणतात. विधानभवनात काँग्रेसच्या नेत्यांशी बोलताना हे लक्षात येते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काही नेते महाविकास आघाडीत एकत्रित राहून लढणार असल्याचे उघड सांगत असले, तरी पवार आणि ठाकरे यांच्यासोबत राहून आपण पक्ष वाढवू शकत नाही, असे त्यांचे मत असल्याचे सांगितले जाते. समोरासमोर आल्यावर हे नेते असे वागतात की, जन्मजन्मांतरीचे मित्र आहेत. यालाच तर राजकारण म्हणतात राव!
जसे जुनी पेन्शन योजना लागून करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुरू झाल्यानंतर आंदोलनेही झाली. राज्याच्या महसुलातला ६६ टक्के हिस्सा वेतन आणि पेन्शनवर खर्च होतो. अवघ्या ३४ टक्के रकमेवर राज्याचा विकास कसा करणार हा खरा प्रश्न आहे. विधानपरिषदेत या विषयावर विविध मार्गाने चर्चा झाली होती. मात्र, विरोधकांनी सरकारचे उत्तर ऐकून न घेता घोषणाबाजी करून गदारोळ केला होता. शुक्रवारी यावर पुन्हा एकदा अल्पकालीन चर्चा उपस्थित केली गेली. त्यावर बरेच सदस्य बोलले. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याचा आग्रह या सदस्यांनी धरला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या चर्चेला अत्यंत वस्तुस्थितीनिदर्शक उत्तर देऊन विरोधकांची टीका निष्प्रभ केली.
जुन्या पेन्शनच्या मागणीसंदर्भात आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांशी बोलायला तयार आहोत, त्यांनी भावनेच्या आहारी न जाता सरकारची बाजू समजून घेतली, तर हा विषय संपेल, असा दावा करताना विरोधकांनीही याबद्दल इगो न बाळगता चर्चेला यावे, कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्षांनी चर्चेसाठी यावे, असे आवाहन अर्थमंत्र्यांनी केले. सरकारची बाजू समजून घेतली की, हा विषय संपेल. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विरोधकांना आनंद होणे योग्य नाही, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी विरोधकांना दिल्यानंतर विरोधकांचा विरोध मावळल्याचे दिसले.


