
कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून तिथे राजकीय धुसफूस सुरू आहे. कर्नाटकात सत्तांतर घडवून आणण्याकरता स्पर्धक पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच, भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारी याद्यांमुळे काही नेते नाराज झाले आहेत. यातील काही नाराज नेत्यांनी दिल्ली दरबारी आपली कैफियत मांडली आहे, तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी थेट पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या मार्गाने निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. लक्ष्मण सावदी आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत, तिथूनच त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी आज कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बंगळुरूत भेटले. सिद्धरामय्या यांच्या घरी ही भेट झाली. या भेटीत लक्ष्मण सावदी यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर डी. के. शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सावदी यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर त्यांनी दुजोरा दिला आहे.




