गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपाला पाठिंबा देतील, अशीही चर्चा सुरू होती. या चर्चांवर स्वत: अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जिवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी यापूर्वी दिलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या दोन ते चार दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडू शकतो, अशा आशयाचं विधान शिरसाट यांनी केलं आहे. अजित पवार हे मनातून कुणाबरोबर आहेत, हे येत्या दोन चार दिवसांत कळेल, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.



