
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ते अडचणीतही आल्याचं दिसून आलं आहे. आता पुन्हा एकदा संतोष बांगर चर्चेत आले असून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांनी त्यांना त्यांच्याच एका आव्हानाची आठवण करत “मिशा कधी काढणार?” असा खोचक सवाल केला आहे. त्यामुळे आता यावर संतोष बांगर हे नेमकी काय प्रतिक्रिया देणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
संतोष बांगर यांनी याआधीही एकदा अयोध्या पौळ यांना जाहीर आव्हान दिलं होतं. अयोध्या पौळ यांनी संजय बांगर यांचा उल्लेख गद्दार असा केल्यानंतर त्यांनी टीका करताना आव्हान दिलं होतं. “आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही”, असं बांगर म्हणाले होते.



