
शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसढसा रडल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यामुळेच माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचंही नमूद केलं. त्या मंगळवारी (९ मे) साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “इथं राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता.



