सातारा : जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व जाहीर सभा ७ जूनला सकाळी ११ वाजता कुडाळ येथे बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे. या सभेत तालुक्यातील समस्या व प्रश्न मांडणार असून, यानिमित्ताने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जावळीतील नेते दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी विधानसभेसाठी आमची ही बांधणी असून, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी भवनात पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दीपक पवार म्हणाले, ‘मध्यंतरी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन जावळी तालुक्यात मेळाव्यासाठी येण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी ७ जून ही तारीख दिली आहे. श्री. पवार यांच्या उपस्थितीत ७ जूनला राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे.’




