भुवनेश्वर – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी २०१९ मध्ये आपले वडील व राज्याचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांची पुरीतील स्वर्गद्वार येथे असलेली समाधी स्मशानभूमीला अधिक जागा मिळण्यासाठी तसेच सौंदर्यी करणासाठी हटविण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती पटनाईक यांचे स्वीय सहाय्यक व्ही. के. पांडियन यांनी दिली. जनतेच्या सोयीसाठी स्वत:च्याच वडिलांचे स्मारक पाडण्याचे आदेश देऊन पटनाईक यांनी देशात नवीन आदर्श निर्माण केला आहे.
ओडिशातील पुरी हिंदू धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. पुरीमधील स्वर्गद्वार येथील स्मशानभूमीत आपल्या नातेवाइकांवर त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्यास त्यांना मोक्ष मिळतो, अशी अनेक भाविकांची भावना आहे. त्यामुळे, त्यांची नातेवाइकांवर पुरीतील स्वर्गद्वारमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असते.
मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे वडील व राज्याचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांचे १७ एप्रिल १९९७ रोजी निधन झाले होते. त्यानंतर, पुरीतील स्वर्गद्वार येथे स्थानिक नागरी संस्थेने त्यांचे भव्य स्मारक उभारले होते. स्वर्गद्वारमधील मोठ्या जागेवर हे स्मारक उभारण्यात आले. मात्र, स्मारकामुळे स्मशानभूमीचा एक भाग बंद राहत असल्याचे लक्षात आल्यावर पटनाईक यांनी ते पाडण्याचा आदेश दिला.




