मुंबई : शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक १८ जूनला मुंबईत होणार असून त्यात उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या याचिकांवर कार्यवाही सुरु केल्याने कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटाने पावले उचलली आहेत.
ठाकरे यांनी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यांची लोकशाही पध्दतीने निवड झाली पाहिजे, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. आमचा गट हीच मूळ शिवसेना असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख म्हणून ठाकरे यांची निवड केल्यास आणि कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड केल्यास शिवसेना मूळ पक्षावरील अधिकार सोडल्याचा निष्कर्ष काढला जाण्याची भीती आहे.
त्यामुळे कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होईल. शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे.




