पुणे – राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गतच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत दोन वर्ष वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. यामुळे पूर्वी असलेली वयोमर्यादा 28 आता वाढवून 30 वर्षे करण्यात आली आहे.
सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीनंतरच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या एकूण 20 हजार संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीयस्तर व मोठ्या शहरामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात देय असलेली रक्कम थेट जमा करण्याबाबत पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे अशी तरतूद आहे. या तरतुदीमध्ये सुधारणा करुन वयोमर्यादा 30 करण्याबाबतची मागणी विविध स्तरावरुन करण्यात येत होती. त्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सुधारणांच्या अनुषंगाने सद्यस्थितीत कार्यरत संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी आदिवासी विकास आयुक्तांकडे सोपविण्यात आलेली आहे.


