सातारा : जावळी तालुक्याचे नेते व राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे आपले विरोधक आहेत, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. पण आता त्यांचे बंधूच विरोधकांना मिळाल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात? याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.



