नागपूर :‘राज्य सरकारविरुद्ध लोकांमध्ये असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. मात्र, ‘पन्नास खोके एकदम ओके तुम्हालाही विसरायचे नाही’, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना करत भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजप विरोधात राणशिगे फुंकली.
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने रेशीमबागेतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. ‘मंडल आयोगाच्यावेळी विरोध करणारे भाजप नेते आता मगरीचे अश्रू ढाळत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने डेटा चुकीचा असल्याचे जाणीवपूर्वक सांगितले. तुमचे मंडल तर, आमचे कमंडल ही घोषणा विसरू नका. त्यांना कोणतेच आरक्षण नको. समान नागरी कायद्याबाबतही नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा छुपा अजेंडा आहे,’ अशी तोफही पवार यांनी डागली.
‘राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य झाले नाही. मंडलविरोधी ढोंगी नेत्यांचा बुरखा फाडण्याचे काम करा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत,’ असा सवाल करून पवार म्हणाले, ‘गद्दारीला वर्ष होईल. निवडणुका घेण्यापासून त्यांना कुणी अडवले, काय होईल, ही धास्ती त्यांना वाटत आहे. विधान परिषदेत राज्यकर्त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे अजित पवारांनी म्हटले आहे.



