सासवड : सार्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आज ( १६ जून ) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे भंडारा उधळून स्वागत करण्यात आले. सासवडहून सकाळी पंढरपुरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा जेजुरीजवळ आला. यावेळी लांबूनच खंडोबाचा गड दिसू लागताच वारकर्यांच्या आनंदाला उधाण आले. दिंड्यांमधील वारकर्यांच्या टाळ-मृदुंगाचा आवाज वाढला. विठूनामाच्या गजराबरोबरच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष सुरु झाला. दिंड्यातील वारकरी नाचू लागले. विविध भारुडे, पदे, अभंग दिंड्यातून ऐकायला येऊ लागली.
“‘अहं वाघ्या, सोहम वाघ्या प्रेमनगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी’, असे अभंग म्हणत वारकर्यांनी देवाच्या दारात मल्हारी वारी मागितली. अठरापगड जातींचं श्रद्धास्थान असलेला खंडोबा व पंढरीचा विठोबा या दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले.



