मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाला पुन्हा खिंडार पडायला सुरुवात झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईत ठाकरे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आली आहे. नेमक्या याच मुहूर्तावर ठाकरे गटातील काही नेते पक्षाला रामराम ठोकताना दिसत आहेत. आज सकाळपासूनच ठाकरे गटाच्या फायरब्रँड प्रवक्त्या मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्या शिबिराला येणे अपेक्षित होते.
परंतु, त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने त्या आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. पक्षात बाजूला पडल्यामुळे शिशिर शिंदे नाराज होते. त्यामुळेच आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे शिशिर शिंदे यांनी म्हटले आहे. शिशिर शिंदे हे कोणत्या पक्षात जाणार, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली तरी शिंदे गटाने त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केल्याचे समजते. त्यामुळे आता ते शिंदे गटाच्या गळाला शिंदे लागणार का, हे पाहावे लागेल.



