मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली. याच दिवसाची आठवण म्हणून ठाकरे गटाकडून आज खोके दिन म्हणून साजरा केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहित आज जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा, असे पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ट्विट केले आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा केला जाणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून आज गद्दार दिन साजरा केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांच्या सुरत गोवा व्हाया गुवाहाटी दौऱ्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यसभेचे मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी सुरत मार्गे गुवाहातीला पलायन केले. त्यानंतर जे काही झाले ते आपल्या सर्वांसमोर आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या या ऐतिहासिक बंडखोरीला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युनायटेड नेशनला पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 20 जून हा आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस साजरा करण्याची मागणी केली आहे.



