पुणे : आगामी निवडणुकांसाठी १ जुलै रोजी अंतिम झालेली मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. निवडणूक आयोगाने जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना पाठविलेल्या अधिसूचनेत ते नमूद करण्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ‘ईव्हीएम’सह व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिटचे स्कॅनिंग व नोंदणी पूर्ण झाली आहे. आता २५ जुलैपासून प्रथमस्तरीय तपासणी सुरु होणार आहे. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या तयारी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात चार हजार ‘ईव्हीएम’ आले आहेत. त्याचबरोबर तीन हजार मशिन जादा दिल्या आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना अशाच पद्धतीने मशिन पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाकेसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होतील की काय, अशी चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यात लोकसभेसाठी एकूण तीन हजार ५०० मतदान केंद्रे आहेत. मतदारांची संख्या वाढल्याने काही मतदान केंद्रे वाढतील, अशी स्थिती आहे. निवडणुकीपूर्वी आता ‘ईव्हीएम’ आणि व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिटचे स्कॅनिंग पूर्ण करून घेण्यात आले आहे. आता निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार २५ जुलैपासून सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी होणार आहे. त्यानंतर त्या सर्व मशिन स्टोअर रूममच्ये सिलबंद ठेवल्या जातील. निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर पुन्हा त्या यंत्रांची अंतिम तपासणी होईल, असेही निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
- दिवाळीत महापालिका, झेडपी निवडणूक एकत्रित?
मार्च २०२२ पासून प्रशासक असलेल्या सर्व महापालिका व जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूक पावसाळा संपताच म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३ मध्ये एकत्रित होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी निवडणूक घेणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीत होण्याची शक्यता असून त्यातून मतदारांचा कल सर्वच राजकीय पक्षांना समजणार आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा निर्णय होऊ शकतो.
- मतदारसंघात अनेकांची होणार गोची
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे भाजपसोबत आता तीन पक्ष असल्याने अनेक मतदारसंघात उमेदवारांची गोची होणार आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे इच्छुक ऐन निवडणुकीत विरोधी पक्षात जावू शकतात.



