अजित पवार गट सत्तेत सामील झाला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, शपथविधी होऊन जवळपास १० दिवस झाले असूनही अद्याप शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांना कोणत्याही खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलेला नाही. खुद्द अजित पवारांनाही अद्याप कोणतं खातं सोपवलेलं नाही. आधीच सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार प्रलंबित असताना आता खातेवाटपाचीही प्रतीक्षा ताणली गेली आहे.]
येत्या काही तासांत खातेवाटप होईल, असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला नेमकी कोणती खाती दिली जाणार? शिंदे गट व भाजपातील कोणत्या मंत्र्यांना त्यांची खाती अजित पवार गटासाठी सोडावी लागणार? यावर सध्या चर्चा चालू आहे. यासंदर्भात ९ खात्यांची सध्या जोरदार चर्चा चालू असून त्यात सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असणाऱ्या अर्थखात्याचाही समावेश आहे.
अर्थखात्यासह एकूण ९ खाती अजित पवार गटाला मिळणार!
अर्थखात्यासह शिंदेगट व भाजपाकडील एकूण ९ खाती अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पर्यटन विभाग, क्रीडा विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, औषध प्रशासन विभाग या खात्यांचा समावेश आहे.



