
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधकांची एकजूट करण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील असल्याचे दिसले आहे. प्रादेशिक पक्षातील अनेक नेत्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी देशभर दौरे केले होते. २३ जून रोजी त्यांच्याच राज्यात पाटणा येथे विरोधकांची पहिली बैठक पार पडली होती. त्यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे दुसरी बैठक संपन्न झाली. या बैठकीत काँग्रेसकडून विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) असे नाव देण्यात आले. या नावाला नितीश कुमार यांनी कडाडून विरोध केला असल्याची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने या नावाची चर्चा कोणत्याही इतर पक्षासोबत केली नव्हती. त्यामुळे अचानक हे नाव उघड केल्यानंतर नितीश कुमार यांना धक्का बसला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव कसे काय दिले जाऊ शकते? असा प्रश्न नितीश कुमार यांनी बैठकीतच उपस्थित केला. सूत्रांनी सांगितले की, विरोधकांना एकत्र करण्यात नितीश कुमार यांनी जे योगदान दिले, ते नाकारले जाऊ शकत नाही. पण ज्याप्रकारे काँग्रेस आघाडीवर ताबा मिळवू पाहतात ते योग्य वाटत नाही. हा निर्णय जनता दल (युनायटेड) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांना निश्चितच धक्का देणारा आहे.




