गुवाहाटी : मणिपूरमधील वांशिक संघर्षांची उत्पत्ती राज्यातील पूर्वीच्या काँग्रेस सरकारांच्या दोषपूर्ण राजकारणातच आहे, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. मणिपूरमध्ये आता काँग्रेस दुटप्पीपणा दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरमा म्हणाले, जेव्हा राज्य आणि केंद्रात काँग्रेसची राजवट होती त्यावेळी त्यांनी मणिपुरात अशांतता असताना एक शब्दही उच्चारला नव्हता. पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या दोषांमुळेच मणिपुरात सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे जुने दोष दूर करण्यास वेळ लागेल, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
मोदींच्या नेतृत्वाखाली मणिपुरातील जुने वांशिक संघर्ष सोडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. काँग्रेस सध्या मणिपूरमध्ये प्रचंड स्वारस्य दाखवत आहे. तथापि अशाच घटनांवर त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कसा प्रतिसाद दिला होता, त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. काँग्रेसचा हा दुटप्पीपणा केवळ चिंतेचाच विषय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे..
यूपीएच्या कार्यकाळात मणिपूर ही ‘नाकाबंदीची राजधानी’ बनली होती. २०१० – २०१७ दरम्यान, जेव्हा काँग्रेसने राज्य केले तेव्हा दरवर्षी ३० दिवसांपासून ते वर्षातील १३९ दिवसांपर्यंत नाकेबंदी कार्यरत होती. २०११ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मणिपूर जळत असताना त्या १२३ दिवसांच्या नाकाबंदीवर एक शब्दही उच्चारला नव्हता. त्यावेळी ते खासगी कंपन्यांना बेलआउट देण्यात व्यस्त होते, असे सरमा म्हणाले.
वस्तुस्थिती अशी आहे की २००४-२०१४ दरम्यान, काँग्रेसचे देश आणि मणिपुरवर राज्य असताना ९९१ हून अधिक नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी जवान मारले गेले. पण मे २०१४ पासून आजपर्यंत ही दुःखद आकडेवारी ८० टक्क्यांनी कमी झाली आहे, असा दावा त्यांनी केला.


