पुणे : कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बाँबस्फोट घडविण्याची चाचणी घेतल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतचा अहवाल राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केला आहे.
महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री अटक केली.

त्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला आहे. खान आणि साकी यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (२५ जुलै) संपली. दोघांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी दोघांच्या पोलीस कोठडीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.




