पुणे : लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांचा विचार करूनच अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभेतील जागा वाटपाचा निर्णय महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आणि केंद्रीय संसदीय समितीकडून घेतला जाईल. महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांना भाजपकडून ताकद दिली जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे स्पष्ट केले.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असेल, याचे उत्तर बावनकुळे यांनी टाळले. मात्र महायुतीचा उमेदवार बारामतीमधून विजयी होईल आणि २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत राज्यातील ४५ पेक्षा जास्त खासदार असतील, असा दावाही त्यांनी केला.
रायगड, बारामती, शिरूर आणि शिर्डी यांच्यासह हातकंगणले, कोल्हापूर, माढा, सातारा या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात आली. या सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.




