पुणे : नळावर पाणी भरण्याच्या वादातून तिघांनी गर्भवती महिलेला मारहाण केली. मारहाणीत महिलेचा गर्भपात झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाघोलीतील गोरे वस्ती परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी रवि धोत्रे, शांताबाई रवी धोत्रे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात गोरे वस्तीत सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या वादातून रवि धोत्रे, शांताबाई धोत्रे आणि एका अल्पवयीन मुलाने गर्भवती महिलेला मारहाण केली. तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिचा गर्भपात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घराजवळील सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना त्यांच्या शेजारील रोहित धोत्रे याने फिर्यादीचा नळाखालील हंडा बाजूला सरकवला. त्यावर फिर्यादी यांनी त्याला माझा नंबर आधी आहे. तू मला पाणी भरु दे. माझे झाल्यानंतर तू पाणी भर असे सांगितले. त्यावर तो शिवीगाळ करु लागले. त्याचे वडील रवी धोत्रे व आई शांताबाई धोत्रे हे सुद्धा तेथे आले. त्यांनीही शिवीगाळ करुन दमदाटी केली. त्यावर फिर्यादीने माझा नंबर पहिला आहे, मी पाणी भरते, त्यानंतर तुम्ही पाणी भरा, असे सांगितले.




