मुंबई शहर, तसेच उपनगरांत बुधवारी (२६ जुलै) रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने मुंबईला शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितलं की, पुढच्या २४ तासांत राज्यात मुसळधार पाऊस होईल. तर, राज्यासाठी पुढचे तीन ते चार तास खूप महत्त्वाचे असल्याचं भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितलं आहे.
आयएमडीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे की, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडेल.
हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितलं की, राज्यातील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने पुढील २४ तासांत राज्यात मान्सून अतिसक्रिय असेल, तर त्यानंतरच्या २४ तासांत मान्सून सक्रिय असेल. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होईल.



