मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफूटीनंतर आता काँग्रेस पक्षही फुटणार असल्याच विधान भाजपाचे दिग्गज नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड केला आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात असल्याचं विधान मुनगंटीवार यांनी एका वृत्तनाहिनी दिलेल्या प्रतिक्रियेत केलं आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
भाजपात येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत. मात्र आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नो रुम अॅव्हेलेबल, हाऊसफुल्ल असा बोर्ड लावला आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांशी आमचं बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगाव की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही. असं थेट आव्हानच सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.



