मुंबई : कच्च्या मालाचे आणि मजुरीचे वाढलेले दर, व्याजदरात झालेली वाढ आणि इतर कारणांमुळे पहिल्या तिमाहित म्हणजे एप्रिल ते जूनदरम्यान बहुतांश मोठ्या शहरांमध्ये घरांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यातील घरांचे दर या तिमाहीत ११ टक्क्यांनी वाढून ८,५४० रुपये प्रति वर्ग फूट झाले आहेत.
ही माहिती क्रेडाई या विकासाच्या संघटनेने कॉलिअर्स इंडिया आणि लीस फोरास या संस्थाबरोबर केलेल्या सर्वेक्षणात आढळून आली आहे. दिल्ली राजधानी क्षेत्रातील घरांच्या किमती १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मुंबईतील घरांच्या किमती ३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आठ मोठ्या शहरात सर्वसाधारणपणे घरांचे दर सात टक्क्यांनी वाढले आहेत.
हैदराबाद येथील घरांच्या किमती १३ टक्क्यांनी वाढल्या. फक्त मुंबईतील घराच्या किमती कमी झाल्या. मुंबईतील घराचे दर सध्या सर्वसाधारणपणे १९,१११ प्रति वर्ग फूट या पातळीवर आहेत. एकूणच बांधकाम क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे नव्या घराचे प्रकल्प वाढले असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
क्रेडाईचे अध्यक्ष बोम्मन इराणी यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता ग्राहक आशावादी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. करोनाच्या काळात तुंबलेली मागणी आता पूर्ण होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता सुधारत आहे. रोजगार निर्मिती वाढली आहे. रेपो दर सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. गेल्या तीन पत धोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केलेली नाही. नजीकच्या भविष्यात परिस्थिती सुधारली तर व्याजदर कमी होऊ शकतात.
अशा परिस्थितीत घरांची मागणी आणखी वाढू शकते असे समजले जात आहे. अहमदाबाद शहरातील घराच्या किमती १० टक्क्यांनी वाढून ६,०५७ वर्ग फूट झाल्या. बंगळुरू शहरातील घराच्या किमती १० टक्क्यांनी वाढून ८,६८८ रुपये वर्ग फूट झाल्या. चेन्नईतील घराच्या किमती ६ टक्क्यांनी वाढून ७,६५३ वर्ग फूट झाल्या. हैदराबाद शहरातील घराच्या किमती १३ टक्क्यांनी वाढून १०,५३० रुपये वर्ग फूट झाल्या आहेत.
____________________
महाग कच्च्या मालाचा प्रश्न
सध्या महागाईचा दर चार टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर रिझर्व्ह बँकेचा रेपो दर साडेसहा टक्के इतका आहे. त्यामुळे एकूणच कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी विकसक प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही ग्राहकाकडून मागणी कमी होताना दिसून येत नाही. अशा परिस्थितीत उत्सवाच्या काळात वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी विकसकांना धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे.



