मुंबई – पुरवठा साखळीवरील परिणामामुळे अगोदरच टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर वाढू लागले आहेत. एकूण मागणी आणि पुरवठा परिस्थिती पाहता सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर सध्याच्या पातळीपेक्षा दुपटीने वाढण्याची शक्यता बाजारात व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचे घाऊक दर पाच रुपये ते २४ रुपये प्रति किलो आहेत व किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे दर २५ ३५ रुपये किलो आहेत. पावसामुळे बराच कांदा खराब झाला आहे. त्याचबरोबर इतर भाज्यांचे दर वाढले आहेत. याचाही कांद्याचे दर वाढण्यावर परिणाम होणार असल्याचे दिसून येते. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरपर्यंत कांद्याचे दर दुपटीने वाढून ६० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. कांद्याचे उत्पादन जास्त झाले होते. मात्र उन्हाळा लांबल्यामुळे उष्णतेचा साठवलेल्या कांद्यावर परिणाम होऊन कांद्याचा दर्जा कमी झाला आहे. त्यामुळे दर्जेदार कांद्याचे दर वाढत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या वर्षी साठा केलेल्या ३.०० लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरसाठ्यातील कांद्याच्या विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे. ज्या राज्यांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती जास्त आहेत अश्या राज्यातील बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ठिकाणी किमतीत वाढ होण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे त्या ठिकाणी ई-ऑक्शनच्या माध्यमातून कांद्याची विक्री होणार आहे.
चालू वर्षात, बफर साठ्यासाठी एकूण ३.०० लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे, परिस्थितीनुसार गरज भासल्यास हा साठा आणखी वाढवता येईल. दोन केंद्रीय नोडल एजन्सी, म्हणून नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जून आणि जुलै महिन्यामध्ये प्रत्येकी १.५० लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदी केला होता. साठवणुकीदरम्यान कांदा अधिक टिकवा यासाठी यावर्षी भाभा अणुसंशोधन केंद्रच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर कांद्याचे विकिरण हाती घेण्यात येणार आहे.



