पुणे : पुणे शहरात दहशतवादी कारवाया करण्याच्या गटात सहभागी असल्याप्रमाणे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणखी एका आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे.
शमील साकिब नाचन (रा. पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि स्फोट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे. ‘एनआयए’ने यापूर्वी झुल्फिकार अली बडोदावाला, महम्मद इम्रान खान, महम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादीर पठाण अशा पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी हे दोघे ‘सुफा’ दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. एप्रिल २०२२ मध्ये राजस्थानात एका कारमधून स्फोटके जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात ‘एनआयए’ने या दोघांना फरार घोषित केले होते.
शमील याच्यासह अटक करण्यात आलेले दहशतवादी ‘इसिस’च्या स्लीपर मॉड्युलचे सदस्य आहेत. पुण्यातील कोंढवा येथील घरातून त्यांची दहशतवादी कृत्ये सुरू होती. त्यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी स्फोटके आणि इतर साहित्य एकत्र केले होते. तसेच बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षणातही त्यांनी सहभाग घेतला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी तयार केलेल्या बॉम्बची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा इसिस दहशतवादी संघटनेचा अजेंडा आहे. या आरोपींनी देशविघातक कृत्ये करण्याचा कट रचला होता, ही बाब ‘एनआयए’च्या तपासात समोर आली आहे.




