मुंबई : पावसाने थोडी विश्रांती दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्हीही गटाकडून पक्ष संघटना बळकटी करण्यासाठी हालचाली सुरू झाले आहेत. खरी राष्ट्रवादी नेमकी कोणाची याचा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने मात्र राज्यभरात स्वतंत्रपणे दौरे काढण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.
अजित पवार गटाने राज्यातील सर्व लोकसभानिहाय मतदारसंघात दौरे काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला तर शरद पवार १७ ऑगस्टला बीडमधे जाहीर सभा घेत आहेत. त्यापूर्वीच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे १३ ऑगस्ट पासून ‘संदेश साहेबांचा या नावाखाली तुळजापूर येथून दौरा सुरू करत आहेत. दरम्यान, अजित पवार गटाने देखील राज्यभरात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कंबर कसली असून, लवकरच सर्व लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर पक्षाच्या कामाची व संघटनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने एक कालबद्ध कार्यक्रम ठेवणार आहोत. राज्यात आमचे मंत्री असून त्यांचा जनता दरबारसुद्धा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पुढील आठवड्यात सुरु करण्यात येईल. – सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)



