मुंबई- एकनाथ शिंदे आराम करण्यासाठी मुख्यमंत्री झालेत का? अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री साताऱ्यातील आपल्या गावी दरेगावात गेले आहेत. ते तीन दिवस येथे राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरुन संजय राऊन यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून माझं काम सुरुच आहे, असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याचं मला कळतंय. ते आराम करताहेत. पण, किती आराम करताहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपण आराम करण्यासाठी मुख्यमंत्री झालो आहोत का हे पाहावं, अशी टीका राऊतांनी केलीये. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी माझं काम करतोय. मी प्रकृती ठीक नसल्याने येथे आलोय.पण, तरीही माझी कामं सुरु आहेत. हजारो लोक मला भेटायला येतात. त्यांची छोटी-मोठी कामं असतात. ते सोडवली जात आहेत.



