मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात पुण्यात झालेल्या ‘गुप्त’ भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीत काय चर्चा झाली याची आपल्याला माहिती नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही गुप्त बैठक नव्हती, असेही पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्याला अशा बैठकीची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. दोन्ही पवारांमध्ये शनिवारी पुण्यातील एका व्यावसायिकाच्या निवासस्थानी भेट झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, मी पवार साहेबांसोबत एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी गेलो आणि लवकर निघालो. नंतर काय झाले ते मला माहीत नाही. दरम्यान, आपल्या बंधुंनाही ईडीची नोटीस आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी, आपल्या बंधुनी ईडी कार्यालयात जाऊन त्यांना माहिती असलेले सर्व तपशील सादर केले. ईडीच्या नोटीसचा कालच्या बैठकीशी संबंध जोडणे चुकीचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.



