नवी दिल्ली, ता. १८ (वृत्तसंस्था) 8 बिहारच्या अररिया जिल्ह्यामध्ये विमल यादव आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून स्थानिक पत्रकाराची हत्या केल्याने खळबळ निर्माण झाली असून राज्यातील कायदा- सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणीगंज बाजार परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त करतानाच ही घटना दुःखद असल्याचे सांगत तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पत्रकारावर अशा पद्धतीने कशा काय गोळ्या झाडल्या जाऊ शकतात? असा सवाल त्यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
‘दैनिक जागरण’चे स्थानिक प्रतिनिधी विमलकुमार यादव (वय ३५) यांची आज पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे हल्लेखोर यादव यांच्या घरी पोचले होते. हल्लेखोरांनी सुरूवातीला दार वाजविले, यादव यांनी ते दार उघडताच हल्लेखोरांनी त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरूवात केली. या पत्रकाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून न्यायवैद्यक पथक आणि श्वानपथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शेजाऱ्यांसोबतच्या पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होतो आहे.




