बंगळूर (पीटीआय) : भारताचे ‘चांद्रयान-३’ आता चंद्रावर उतरण्यास सज्ज झाले आहे. प्रोपल्शन मोड्युलपासून वेगळे झाल्यानंतर विक्रम लँडर आता चंद्राच्या जवळच्या कक्षेत फिरत असून आज त्याची कक्षा आणखी कमी करण्यास ‘इस्रो’ला यश आले आहे. आता यान चंद्राच्या पृष्ठभागापासून ११३ x १५७ किलोमीटर अंतरावर आहे.
‘इस्रो’ने एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. विक्रम लँडरची कक्षा रविवारी (ता. २०) आणखी कमी करण्यात येणार आहे. त्यावेळी रात्री दोन वाजता ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानाची गती कमी करण्यासाठी कशाबदल केला जातो. जिथे चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू ३० किलोमीटर असेल आणि लांबचा बिंदू १०० किलोमीटर असेल, अशा ठिकाणी लँडरला स्थापन करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. लँडर मोड्युलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर (बग्गी) यांचा समावेश आहे.
‘विक्रम’ने काढली चंद्राची छायाचित्रे
दरम्यान, प्रोपल्शन मोड्युलपासून स्वतंत्र झाल्यानंतर ‘चांद्रयान- ३ च्या विक्रम लँडरवरील ‘लँडर इमेजर (एलआय) कॅमेरा- वन ने टिपलेली चंद्राची छायाचित्रे ‘इस्रो’ने आज प्रसिद्ध केली. या छायाचित्रात चंद्रावरील विवरे दिसत असून त्याची नावे ‘फार्बी’, ‘गिओरडॅनो ब्रुनो’ आणि ‘हरखेबी जे’ अशी आहेत.




