नवी दिल्ली: भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत आता लवकरच आपल्या नव्या रुपात समोर येत आहे. आतापर्यंत वंदे भारत ट्रेनचा रंग पांढरा किंवा निळा रंगात आल्या आणखी एका रंगाचा समावेश होणार असून येत्या काळात भगव्या रंगाच्या ट्रेन आपल्याला दिसू लागतील.
चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीकडून बनवण्यात आलेली नवी ट्रेन ८ डब्यांची असून भगव्या आणि राखाडी रंगाची आहे. वंदे भारत ट्रेनवर लावण्यात आलेल्या चित्त्याच्या लोगोमध्येही बदल करण्यात आला आहे. यासह फिचर्समध्ये जवळपास २५ बदल करण्यात आले आहेत. भगव्या रंगाच्या वंदे भारत ट्रेनचा ट्रायल घेण्यात आला असून लवकरच ट्रेन लोकांच्या सेवेत येणार आहे. रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून याचे फोटो शेअर केले आहेत. भविष्यात याच रंगातील वंदे भारत ट्रेनचे निर्माण होण्याची शक्यता आहे.




