पुणे : तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सोमवारी तीन सत्रातील परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू करण्याची वेळ आली. परीक्षेसाठी वेळ वाढवून दिली असली तरी परीक्षार्थीना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एका नव्हे, तर सर्वच केंद्रावर सर्व्हर डाउनमुळे तलाठी भरती परीक्षेचा सावळागोंधळ समोर आला आहे.
राज्यात दि. १७ ऑगस्टपासून तलाठी परीक्षा सुरू आहेत. टीसीएस कंपनीमार्फत या परीक्षा घेण्यात येत आहे. सोमवारी राज्यातील ३० जिल्ह्यांमधील ११५ टीसीएस केंद्रावरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९ ते ११ या दरम्यान नियोजित करण्यात आले होते. मात्र टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेने सकाळचे पहिले सत्र वेळेनुसार सुरू करण्यास अडचण निर्माण झाली. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परीक्षा उशिरा सुरू होण्याबाबत कळविले.
टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्व देशभरातील परीक्षेसंदर्भातील हा तांत्रिक बिघाड झाला असल्याने वरिष्ठ तंत्रज्ञ स्तरावर युद्धपातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परीक्षा ११ वाजता सर्व केंद्रांवर सुरू करण्यात आली. अशी माहिती भूमि अभिलेख विभागाचे अपर आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
राज्यात सुरू असलेल्या तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही. परीक्षार्थीना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील. तसेच टीसीएस कंपनीच्या सर्व्हर डाउन घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत करण्यात येईल.
– राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री



