पावसाने पाठ फिरवल्याने विहीर आटल्या, पिके करपली, मराठवाड्यातील काही गावात तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची (Tanker) वाट पहावी लागते आहे. पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात टँकरची संख्या गेल्या महिन्यापेक्षा दीडपटीने वाढली आहे.
औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील अंतरवली गावात तर आज अशी परिस्थिती आहे की, पाणी नसल्याने अर्धे लोकं अंघोळच करत नाही.
त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत कोणत्या उपयोजना राबवल्या जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून ओळख असलेलं जायकवाडी धरण ज्या पैठण तालुक्यात आहे, तेथील पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे.
कारण याच पैठण तालुक्यातील अंतरवली गावातील नागरिकांना भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अंदाजे 300 लोकांची वस्ती असलेल्या या अंतरवलीत 2 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे दिवस निघाला की, पाण्याचं टँकर कधी येणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलेले असतात.
एवढच काय तर पाण्याची बचत व्हावी म्हणून गावातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी रोज अंघोळ करणे सोडून दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तर जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर 43 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात आज घडीला एकूण 84 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.


