पिंपरी, दि. २२ ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते आज (दि. २२) मुंबई प्रदेश कार्यालय येथे पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्षपदी ज्योती सचिन निंबाळकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, काशिनाथ नखाते, सचिन निंबाळकर, विशाल शिरसागर, विशाल शिंदे, शाहिद शेख, अशोक हरपळे, सुवर्णा वाळके, कविता देवकर, दिपाली पारखे, मनीषा निंबाळकर आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण म्हणाल्या, “शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेनुसार देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने दडपशाही करणाऱ्या भ्रष्टाचारी भाजप सरकारच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभे झाल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. जनतेच्या मनात काय आहे हे येवला आणि बीड येथील झालेल्या सभेत जनतेने दाखवून दिले आहे. लोकशाही वाचवण्याच्या या लढाईमध्ये राज्यातील महिला, युवक-युवती हे शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर म्हणाल्या “आमची थेट लढाई ही भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपसोबत असून येणाऱ्या काळात शरदचंद्रजी पवार साहेब, संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या विचारधारेनुसार महिला संघटना मजबूत करणार असून, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि कार्यकारी समितीमधील सदस्य व शहरातील महिला यांच्या साथीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेतून हद्दपार करत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकवणार या दृष्टीने राष्ट्रवादी महिला आघाडी काम करणार असून असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशअध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.




