मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडाळीनंतर अवघ्या महाराष्ट्रात रान पेटले आहे. त्यातच अजित पवार व जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. पण आता स्वतः जयंत पाटलांनी आपले अजित पवारांसोबत कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
पाटील म्हणाले की, शरद पवारांना सोडून जाणारे आजही त्यांना मानतात ते आग्रहाने पवार साहेब आमचे विठ्ठल असल्याचे सांगतात. त्यांचा फोटो लावतात. त्यावर मी आक्षेप घेणे योग्य नाही. अजित पवार व माझ्यात कोणताही वाद नाही. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. तसेच, कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, तो राष्ट्रवादीनेच लढवावा अशी आमची इच्छा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मविआच्या सभांना लवकरच सुरुवात
लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवकाश आहे. सध्या पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. जनतेचा या राजकारणाला विरोध आहे. शरद पवार हीच गोष्ट जनतेपुढे जावून सांगत आहेत. हसन मुश्रीफ यांनाही शरद पवार यांच्याविषयी आदर आहे. त्यांनी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतील. पवारांच्या कोल्हापूरच्या सभेत याची उत्तरे मिळतील. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभाही लवकरच सुरू होतील, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.


