पुणे : मोटारींच्या शोरूममध्ये दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने मुंबईतून अटक केली. टोळीने महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यात २१ गुन्हे केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने सहा जणांना अटक केली. सावन दवल मोहिते (वय १९, रा. दहिखेड, जि. अकोला), बादल हिरालाल जाधव (वय १९, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव), सोनू नागुलाल मोहिते (वय २२, रा. विचवा, जि. जळगाव), अभिषेक देवराम मोहिते (वय २०), जितू मंगलसिंग बेलदार (वय २३, दोघे रा. धानोरा, जि. जळगाव) आणि पिंटू देवराम चौहान (वय १९, रा. इंदूर, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
बिबवेवाडीतील एका मोटर्स शोरूममधून चोरट्यांनी चार लाख ९६ हजारांची रोकड चोरली होती. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही असाच प्रकार घडला होता. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार युनिट पाचचे पोलिस निरीक्षक उल्हास दम यांनी पथक तयार केले. तपास पथकातील सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार चेतन चव्हाण, राजस शेख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी एका संशयित मोटारीच्या मालकाचे नाव आणि पत्ता शोधला. ती मोटार जळगाव येथील असून, तीन वर्षांपूर्वी जळगावमध्ये अशा प्रकारच्या सहा घटना घडल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या चोरट्यांची माहिती काढली. त्यांचा पाठलाग करीत पोलिस नवी दिल्ली, मथुरा, हरिद्वारला गेले. चोरटे मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चोरट्यांना बांद्रा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. आरोपींकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने कारवाई केली.




