पुणे : वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गात बदल झाल्यानंतर मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळाची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे महापालिका व महामेट्रोच्या प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाईल. प्रत्यक्ष जागांची पाहणी करून वाहनतळासाठी जागा निश्चित केल्या जातील.
दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा चर्चेत आला. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग डेक्कन, आगाखान पॅलेस या भागात बदलण्यात आला. जंगली महाराज रस्त्यावरून जाणारी मेट्रो डेक्कन कॉर्नर येथून नदीपात्रातून महापालिकेच्या दिशेने नेण्यात आली.
आगाखान पॅलेस ही वास्तू ऐतिहासिक वारसास्थळांमध्ये असल्याने मेट्रोच्या कामाला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे वनाजकडून येणारी मेट्रो नगर रस्त्यावर येरवडा येथून कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आली व ती पुढे रामवाडी येथे नगर रस्त्याला जोडण्यात आली. त्यामुळे मेट्रो स्थानकांची जागा बदलली आहे. वनाज ते रूबी हॉल क्लिनिक दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाली आहे. नगर रस्त्यावरील मेट्रोसेवा पुढील काही महिन्यांत सुरू होणार आहे.
मेट्रो प्रवाशांना त्यांची वाहने स्थानकाजवळ लावण्यासाठी वाहनतळ आवश्यक असल्याने या मार्गालगतच्या जागांची पाहणी करून जागा निश्चित केल्या जातील. महापालिकेच्या जागेवर महामेट्रो वाहनतळ विकसित करेल, असे प्रकल्प विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले.



