मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी झाले असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी सहा नवीन कारागृह बांधली जाणार आहे. ज्यामुळे किमान दहा हजार कैद्यांचा ताण कमी होणार आहे.
ही नवीन कारागृहे येरवडा (पुणे), पालघर, नारायणडोह (अहमदनगर), ठाणे, कारंजा (जि. गोंदिया), बासंबा (जि. हिंगोली), खेडी शिवार (जि. जळगाव) आणि मुंबईत मंडाला येथे गृह विभागाने नवीन कारागृहासाठी जागा अधिग्रहित केली आहे. मंडालाजवळ होणारे कारागृह बहुमजली बांधता येईल का याबाबतची चाचपणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात बांधली जाणारी ही सहाही कारागृहे महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून बांधली जाणार आहेत. या महामंडळातर्फे प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागाराची नेमणूक करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांची गर्दीमुळे घुसमट व्हावी, अशी परिस्थिती आहे. त्यावर मानवी हक्क आयोगाने देखील वारंवार राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातील ६० कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत.
नवीन कारागृह व कैद्यांची क्षमता
येरवडा, पुणे :3000
मंडाला (मुंबई) : १५००
पालघर : १५००
नारायणडोह (जि. अहमदनगर) : ५००
ठाणे : ३०००
कारंजा (जि. गोंदिया) : ५००
बासंबा (जि. हिंगोली) : ५००
खेडी शिवार (जि. जळगाव) : ३४९



