मुंबई, ता. २६ : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी टाटा मोटर्सने मोलाचे योगदान दिले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून निमलष्करी दल, राज्य पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करता यावा, यासाठी कंपनीने केंद्रीय पोलिस कल्याण भांडाराशी (केपीकेबी) सामंजस्य करार केला आहे.
असा करार करणारी देशातील ही पहिली ‘ईव्ही’ उत्पादक कंपनी आहे. या सहकार्यामुळे टाटा मोटर्सच्या टियागो, टिगोर आणि नेक्सॉन या मोटारी लाभार्थीसाठी विशेष दरांमध्ये उपलब्ध असतील. रेल्वे सुरक्षा दल, इंटेलिजन्स ब्युरो, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, इंडो- तिबेट बॉर्डर पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल, सशस्त्र सीमा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, आसाम रायफल्सचे कार्यरत आणि निवृत्त कर्मचारी; तसेच राज्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रीय पोलिस कल्याण भांडार (केपीकेबी) काम करते. या सर्व दलांच्या कर्मचाऱ्यांना आता टाटाची ही इलेक्ट्रिक वाहने सवलतीच्या दरात मिळणार आहे.



